पुण्यातील राजकीय चित्र बदलणार; भाजपविरोधात जनतेचा जनआक्रोश ठरणार – वंचित बहुजन आघाडी

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या ठाम, दूरदर्शी व दिशादर्शक नेतृत्वाखाली पुणे शहराची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, विधानसभा व प्रभाग समन्वयक, प्रभाग पदाधिकारी तसेच लढाऊ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत सखोल व व्यापक चर्चा करण्यात आली. मार्गदर्शन करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, वंचित बहुजन आघाडी ही केवळ पर्याय नसून पुणे महानगरपालिकेतील निर्णायक राजकीय शक्ती ठरणार आहे. “निवडणूक फक्त लढवायची नाही, तर ती जिंकायचीच,” असा ठाम निर्धार प्रत्येक कार्यकर्त्याने करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सर्व प्रभागांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ताकदीने उभे राहतील, तसेच प्रभागनिहाय संघटन अधिक मजबूत करून इतर सर्व राजकीय पक्षांच्या गणितांना धक्का देण्याची तयारी ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

बैठकीत नमूद करण्यात आले की, आज देश व राज्यात सत्तेच्या जोरावर लोकशाही, संविधान, सामाजिक न्याय व मूलभूत हक्कांवर घाला घालणाऱ्या भाजपविरोधात ही पुणे महानगरपालिका निवडणूक जनतेचा जनआक्रोश ठरणार आहे. पुण्यातील बहुजन, कष्टकरी, कामगार, महिला, युवक, विद्यार्थी, अल्पसंख्याक व उपेक्षित घटकांचा बुलंद आवाज वंचित बहुजन आघाडी ठामपणे मांडणार असल्याचे सांगण्यात आले.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उद्देशून “घोषणांपुरते मर्यादित न राहता घराघरांत पोहोचावे, स्थानिक प्रश्न प्रभागनिहाय उचलून धरावेत आणि संघटन वाढवून पुण्यातील सत्तेचा केंद्रबिंदू वंचित बहुजन आघाडीला बनवावे,” असे आवाहन करण्यात आले. येणाऱ्या निवडणुकीत वंचितचा प्रत्येक उमेदवार हा जनतेचा खरा प्रतिनिधी असेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

ही निवडणूक केवळ लढत नसून वंचित बहुजन आघाडीच्या निर्णायक उदयाची सुरुवात ठरेल. येत्या निवडणुकीत पुण्यातील राजकीय चित्र बदलेल आणि इतर सर्व पक्षांना वंचित बहुजन आघाडीची धास्ती वाटेल, असा निर्धार बैठकीत करण्यात आला.

या बैठकीत राष्ट्रीय महासचिव ॲड. प्रियदर्शी तेलंग, प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी प्रस्तावना मांडली. अध्यक्षा अनिता चव्हाण, युवा आघाडी अध्यक्ष सागर आल्हाट, माथाडी अध्यक्ष विशाल कसबे, सम्यक विद्यार्थी आंदोलन अध्यक्ष चैतन्य इंगळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसिद्धी प्रमुख संदीप चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन महासचिव ॲड. रेखा चौरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button