वडिलांच्या आठवणींनी भावूक झाली अभिनेत्री प्रार्थना बेहेरे; इन्स्टाग्राम व्हिडिओत व्यक्त केलं मनातलं दुःख

पुणे, दि. १४ : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचं १४ ऑक्टोबर २०२५ रोजी रस्ते अपघातात दुःखद निधन झालं होतं. या घटनेला आज दोन महिने पूर्ण झाले असून, या दिवशी प्रार्थनानं सोशल मीडियावर एक भावूक व्हिडिओ शेअर करत आपल्या मनातलं दुःख व्यक्त केलं आहे.

प्रार्थनानं Instagram वर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती म्हणते,

“नमस्कार! आजचा व्हिडिओ करतेय कारण आज १४ तारीख आहे. आज दोन महिने झाले माझ्या बाबांना जाऊन. बाबांसाठी हा व्हिडिओ करतेय. मला खरंतर आज काहीच सुचत नाहीये. मी आजवर कधीच अशा प्रकारे व्यक्त झालेले नाही.”
ती पुढे म्हणते की, अनेक चाहत्यांचे मेसेज तिला मिळाले असून हे दुःख कायम मनात राहणार आहे.
“बाबा मला नेहमी म्हणायचे की मी तुझा खूप मोठा फॅन आहे. आता बाबा नाहीयेत, पण मला माहिती आहे की तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात,” असं भावूक होत तिनं सांगितलं.

याच व्हिडिओत प्रार्थनानं चाहत्यांना पुढील संकेत देत म्हटलं की,

“मी उद्या काहीतरी स्पेशल घेऊन येतेय. जे खरंतर माझ्या बाबांसाठी आहे आणि तुम्हा सगळ्यांसाठी आहे. यासाठी मला तुमचा सपोर्ट आणि आशीर्वाद हवाय. बाबा असताना त्यांनी माझं हे काम पाहिलं होतं. आता बाबा नसताना ते काम प्रदर्शित होणार आहे. तुमचा पाठिंबा कायम ठेवा. थँक्यू सो मच.”
प्रार्थनाच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर भावनिक प्रतिक्रिया येत असून, अनेकांनी तिला धीर देत पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button