
पुणे दि 14 : देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडणार असल्याचा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. येत्या 19 डिसेंबरला भारतात आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, पंतप्रधान बदलतील आणि मराठी माणूस देशाचा पंतप्रधान बनेल, असे भाकीत त्यांनी केले.
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जनगणमन’ या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर माध्यमांशी बोलताना चव्हाणांनी हा दावा केला. त्यांनी सांगितले की, जगात सुरू असलेल्या घडामोडींचे पडसाद भारतात उमटणार आहेत. या संदर्भात त्यांनी अमेरिकेतील एका कथित स्टिंग ऑपरेशनचा उल्लेख केला.
चव्हाणांच्या मते, अमेरिकेत एका व्यक्तीने—जो इस्रायलचा गुप्तहेर असल्याचा दावा आहे—अनेक दिग्गजांच्या बंगल्यांमध्ये कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केले. या स्टिंगमधून मोठ्या नावांचा पर्दाफाश होण्याची शक्यता असून, अमेरिका सरकार 19 डिसेंबरला विशेष कायदा करून त्या दिग्गजांची नावे जाहीर करू शकते, असा दावाही त्यांनी केला.
“या स्टिंगमध्ये कोणकोणाची नावे आहेत, याची मला सविस्तर माहिती नाही,” असे स्पष्ट करत, या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम भारताच्या राजकारणावर होऊ शकतो आणि त्यामुळेच 19 डिसेंबरला मोठी उलथापालथ घडेल, असे चव्हाणांनी म्हटले.
दरम्यान, नवा पंतप्रधान हा मराठी माणूस असेल आणि तो व्यक्ती सत्ताधारी भाजप मधीलही असू शकतो, असे संकेत देत चव्हाणांनी चर्चेला आणखी चांगलीच धार दिली. चव्हाण सध्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.या भाकीतामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, 19 डिसेंबरकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.