पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार – चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. १३ : पुणे पुस्तक महोत्सवाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता येत्या काळात पुणे ही पुस्तकाची राजधानी करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील, तसेच पुढील वर्षी हा महोत्सव जागतिक पुस्तक महोत्सव म्हणून आयोजित करण्याचा मानस असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालय येथे १३ ते २१ डिसेंबरदरम्यान आयोजित तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सव*च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक विश्वास पाटील, *नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे, मुख्य संयोजक राजेश पांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत आदी मान्यवर उपस्थित होते.

पहिल्या वर्षी सुमारे ११ कोटी, तर दुसऱ्या वर्षी तब्बल ४० कोटी रुपयांची पुस्तकविक्री झाल्याचे नमूद करत श्री. पाटील म्हणाले की, युनेस्कोमार्फत मूल्यमापन सुरू असून पुण्याला जागतिक पुस्तक राजधानीचा दर्जा मिळवण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. असे झाल्यास पुढील वर्षी जागतिक पातळीवरील प्रकाशक व लेखक पुण्यात येतील.

ई-बुकच्या युगातही छापील पुस्तकांचे वाचन टिकून राहील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मराठी भाषा, नाटक, चित्रपट, साहित्य व गीतांद्वारे मातृभाषेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

यावेळी श्री. मोहोळ म्हणाले की, पुणे पुस्तक महोत्सव केवळ पुस्तक खरेदीपुरता मर्यादित न राहता भारतीय विचार, संवाद व संस्कृतीचा खरा उत्सव ठरला आहे. देश-विदेशातील विविध भाषांतील पुस्तके, वैचारिक चर्चासत्रे, नवोदित लेखकांना व्यासपीठ आणि सर्व वयोगटात वाचनसंस्कृती रुजविण्याचे काम या महोत्सवातून होत आहे.

लेखक विश्वास पाटील यांनी दिल्ली व कोलकात्याच्या धर्तीवर पुण्यात होत असलेल्या या भव्य आयोजनाचे कौतुक केले. यावेळी त्यांची कादंबरी लस्ट फॉर मुंबईचे अनावरण करण्यात आले.

महोत्सवात सुमारे ७५० हून अधिक पुस्तक दालनांमध्ये देश-विदेशातील साहित्य उपलब्ध असून, १६ डिसेंबरपासून पुणे साहित्य महोत्सवाचे आयोजन होणार आहे. कार्यक्रमानंतर मान्यवरांनी विविध दालनांना भेट देऊन पुस्तके व उपक्रमांची माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button