उत्तम ज्ञानासाठी ग्रंथाशिवाय पर्याय नाही – विश्वास पाटील

पुणे दि. 14 : उत्तम ज्ञान मिळवायचे असल्यास ग्रंथाशिवाय पर्याय नाही. ग्रंथ हे माणसाचे खरे मित्र असून, वाचनातून आनंद घेतला तर जीवनात समाधान आणि सुख निर्माण होते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुणे शहर आगामी काळात पुस्तकांची पंढरी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (राष्ट्रीय पुस्तक न्यास) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे शनिवारी जल्लोषात उद्घाटन झाले. यावेळी चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
विश्वास पाटील म्हणाले की, आज प्रत्येक भारतीयाचा मोठा वेळ मोबाईलवर जात आहे, ही चिंताजनक बाब आहे. वाचनाची सवय टिकवण्यासाठी काही ग्रामपंचायतींनी मुलांना सायंकाळी मोबाईल न देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे पुस्तक महोत्सवाने नव्या तंत्रयुगात ग्रंथप्रेमाची पालखी उचलली असून, त्यातून उत्तमोत्तम विचार देशभर पोहोचतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणेकर या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात, हे पहिल्याच दिवशी झालेल्या गर्दीतून स्पष्ट झाले आहे. वाचन चळवळ वाढवण्यात या महोत्सवाचा मोठा वाटा असून, भविष्यात हा उपक्रम ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पुणे पुस्तक महोत्सवात येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० रुपयांचे पुस्तक कूपन देण्यात येणार असून, महाविद्यालयांना पुस्तक खरेदीसाठी १० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. २०२७ मध्ये पुण्याला पुस्तकांची जागतिक राजधानी बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी सांगितले की, हा महोत्सव चिल्ड्रन कॉर्नर, पुणे लिटरेचर फेस्टिव्हल, फूड कोर्ट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेला आहे. पुणे व नागपूर येथे पुस्तक महोत्सव होत असल्याने महाराष्ट्र हे दोन मोठे पुस्तक महोत्सव आयोजित करणारे राज्य ठरले आहे.
मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी माहिती दिली की, पुढील पुणे पुस्तक महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केला जाणार असून, पुण्याची ओळख पुस्तकांची राजधानी म्हणून निर्माण करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button