बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये’ — रिंकू राजगुरूची ‘आशा’ १९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे दि. 14 : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आशा’ चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. ‘बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये’ ही प्रभावी आणि अर्थपूर्ण टॅगलाईन महिलांच्या संघर्षांची तीव्र जाणीव करून देते. महिलांची जिद्द, समाजाशी सुरू असलेला लढा आणि वास्तववादी प्रवास ‘आशा’मधून संवेदनशीलपणे उलगडताना दिसतो.

ट्रेलरमध्ये रिंकू राजगुरूने साकारलेली ‘आशा’ ही केवळ एक व्यक्तिरेखा न राहता अनेक स्त्रियांची प्रतीक ठरते. गावोगावी लोकांच्या आरोग्याची जबाबदारी पेलणारी आरोग्य सेविका, कुटुंबातील ताणतणावांना सामोरी जाणारी स्त्री, अन्यायाविरोधात ठाम उभी राहणारी योद्धा आणि स्वतःचं ध्येय साध्य करण्यासाठी न थकता झगडणारी व्यक्ती—आशाचे हे सर्व पैलू ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दिसतात. तिच्या आयुष्यातील धग, वेदना आणि तळमळ प्रेक्षकांच्या मनाला भिडते.

चित्रपटातील ‘चालत रहा पुढे’ हे प्रेरणादायी गाणे सध्या चर्चेत असून सोशल मीडियावर त्याला भरभरून दाद मिळत आहे. आशाच्या संघर्षाला ऊर्जा देणारा हा सूर अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

रिंकू राजगुरूसह सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सामाजिक वास्तव, महिलांवर येणारे कठोर निर्णय, भावनिक दडपण आणि अस्मितेची लढाई यांचा प्रभावी संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘आशा’ ही केवळ एका आरोग्य सेविकेची कथा नसून, दररोज विविध स्तरांवर झगडणाऱ्या लाखो महिलांची कहाणी आहे, हेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक दिपक पाटील म्हणतात, “‘आशा’ हा केवळ एका आरोग्य सेविकेचा प्रवास नाही; ती त्या लाखो स्त्रियांची प्रतिनिधी आहे ज्या आयुष्यभर इतरांसाठी झिजतात, स्वतःच्या भीतींवर मात करतात आणि कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाहीत.”

दिग्दर्शक दिपक पाटील यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या ‘आशा’चे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील असून सहनिर्माते मुरलीधर चटवानी व रवींद्र औटी आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून प्रदर्शित होणारा हा चित्रपट नाविन्यपूर्ण कथानक व वास्तववादी मांडणीसह १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button