शासकीय योजनांचा लाभ घेत तरुणांनी उद्योजक व्हावे – हर्षवर्धन रानडे

पुणे: तरुणाईसमोर स्वयंरोजगार व उद्योगाच्या मोठ्या संधी उपलब्ध असून, प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून नव्या उद्योजक कल्पना प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे. उद्योग उभारण्यासाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध आहेत. स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडियासारख्या उपक्रमांतून अनुदान व मार्गदर्शन दिले जात असून, तरुणांनी त्याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन उद्योग मार्गदर्शक हर्षवर्धन रानडे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खडकवासला विधानसभा मतदारसंघ व प्रभाग क्रमांक ३४ यांच्या वतीने आयोजित उद्योजकता विकास मेळावा, क्रिकेट स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल, चित्रकला व निबंध स्पर्धा आदी सामाजिक उपक्रमांच्या उद्घाटनावेळी रानडे बोलत होते.

यावेळी राम माळी, सुभाष हगवणे, राजेश जाधव आणि आनंद जोशी यांना उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास महिला शहराध्यक्षा स्वाती पोकळे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, ओबीसी प्रदेशाध्यक्ष मंजिरी घाडगे, पंचायत समितीच्या माजी सभापती प्रभावती भूमकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखाताई दमिष्टे, नऱ्हे गावचे माजी सरपंच पोपट खेडेकर, युवक अध्यक्ष शरद दबडे, सोशल मीडिया सेल अध्यक्ष निलेश दमिष्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सुरेखाताई दमिष्टे म्हणाल्या की, शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गेली ३० वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. वाढती बेरोजगारी आणि विकसित होत असलेली स्टार्टअप संस्कृती लक्षात घेऊन तरुण उद्योजक घडवण्यासाठी हा व्यावसायिक मेळावा आयोजित करण्यात आला असून, तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

निलेश दमिष्टे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी शिवाजीनगर येथील एव्हिएशन गॅलरी व पर्वती येथील क्रिकेट संग्रहालय येथे शैक्षणिक सहल, वडगाव व धायरी येथील क्रीडांगणांवर क्रिकेट स्पर्धा, तसेच विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button