शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा २०२५ : २,२०७ उमेदवारांचे निकाल रद्द

पुणे, दि. १२ : ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा–२०२५’ उत्तीर्ण झाल्यानंतरही आवश्यक व्यावसायिक अर्हतेची (बी.एड./डी.एल.एड.) कागदपत्रे मुदतीत सादर न केल्यामुळे २ हजार २०७ उमेदवारांचे निकाल रद्द करण्यात आले आहेत. ही माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

परीक्षेसाठी अर्ज भरताना बी.एड. किंवा डी.एल.एड. परीक्षेस अपीअर्ड असल्याचे नमूद केलेल्या उमेदवारांना, परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत संबंधित गुणपत्रक किंवा अन्य वैध प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र, कागदपत्रे वेळेत न सादर केल्यामुळे २,५३७ उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले होते.

या उमेदवारांना १५ सप्टेंबरपर्यंत आणि त्यानंतर एसएमएसद्वारे सूचना देऊन २५ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली. तरीही २,२०७ उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, त्यामुळे त्यांचे निकाल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

निकाल रद्द झालेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, याबाबत येणाऱ्या कोणत्याही विनंतीचा सध्या विचार केला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button