
मुंबई, दि. 13 : महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळ, भक्कम पायाभूत सुविधा आणि उद्योगपूरक धोरणांमुळे राज्य ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) साठी देशातील अग्रगण्य ठरत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि जागतिक गुंतवणूक कंपनी ब्रुकफिल्ड यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली मुंबईतील पवई येथे आशियातील सर्वात मोठे GCC उभारले जाणार आहे.
ब्रुकफिल्डकडून पवईतील 6 एकर जागेवर सुमारे 20 लाख चौरस फूट भाडेतत्त्वावरील बांधकाम असलेला हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, 20 वर्षांच्या कराराअंतर्गत एका बहुराष्ट्रीय बँकेचे GCC येथे कार्यरत होणार आहे. हा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होणार असून, त्यातून 1 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक आणि 30 हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “या प्रकल्पामुळे महाराष्ट्रावरील जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी राज्य शासन स्थिर व सक्षम वातावरण देण्यासाठी कटिबद्ध आहे.”
या प्रकल्पात 100 टक्के हरित ऊर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट असून, इमारत जागतिक दर्जाच्या शाश्वत बांधकाम मानकांनुसार उभारली जाणार आहे. त्यामुळे मुंबईचे GCC हब म्हणूनचे स्थान अधिक मजबूत होईल.
ब्रुकफिल्डने यापूर्वी 2024 मध्ये पुण्यात एका मोठ्या वित्तीय सेवा कंपनीसाठी ‘बिल्ड-टू-सूट’ टॉवर उभारला होता. त्याच वर्षी MMRDA सोबत 12 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला, तर जून 2025 मध्ये कंपनीने बांद्रा-कुर्ला संकुलात 2.1 एकर जागा खरेदी केली आहे.
ब्रुकफिल्डचे वरिष्ठ गुंतवणूक अधिकारी अंकुर गुप्ता म्हणाले, “आशिया खंडातील कार्यालय विकास क्षेत्रात नवा मापदंड ठरेल असा हा आयकॉनिक प्रकल्प आम्ही उभारत आहोत. मुंबईतील आमची एकूण गुंतवणूक आता 4 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे.”