
मुंबई, दि. ११ : भारतीय पारंपरिक चर्मकलेचा जगभर विस्तार करण्यासाठी कोल्हापुरी चपलांचा वारसा आता जागतिक फॅशन मंचावर झळकणार आहे. जागतिक ख्यातीचा लक्झरी ब्रँड प्राडा, महाराष्ट्र शासनाचा लिडकॉम आणि कर्नाटक शासनाचा लिडकार यांच्या दरम्यान महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला. इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली–भारत व्यापारी परिषदेच्या पार्श्वभूमीवर या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या करारानुसार पारंपरिक कोल्हापुरी चप्पल निर्मितीची शतकांपासूनची कौशल्यपूर्ण पद्धत आणि प्राडाच्या आधुनिक, समकालीन डिझाइन तंत्राचा संगम साधून ‘Prada – Made in India, Inspired by Kolhapuri Chappals’ हे विशेष कलेक्शन तयार केले जाणार आहे. हे कलेक्शन फेब्रुवारी २०२६ पासून प्राडाच्या ४० ग्लोबल स्टोअर्स आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे सक्रिय सहकार्य लाभले. लिडकॉमचे अध्यक्ष आणि प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार अंतिम झाल्याचे लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, “या भागीदारीमुळे हजारो कारागिरांना जागतिक मार्ग खुला होणार आहे. भारतीय कारागिरांच्या कलेला नवी ओळख मिळेल.” तर लिडकॉमच्या एमडी प्रेरणा देशभ्रतार यांनी या कराराला “कारागिरांच्या पिढ्यांचा सन्मान” असे म्हटले. लिडकारच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. के. एम. वसुंधरा यांनीही हा उपक्रम महाराष्ट्र–कर्नाटकातील चप्पलकारांच्या प्रशिक्षण आणि रोजगाराला मोठी चालना देईल, असे नमूद केले.
प्राडा समूहाचे सामाजिक उत्तरदायित्व विभाग प्रमुख लोरेंझो बर्टेली यांनी हे सहकार्य “सांस्कृतिक आदानप्रदानाची नवी दिशा” असे म्हटले. जीआय टॅग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांचा जागतिक प्रवास आता अधिक भक्कम होणार आहे.