विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी सोई-सुविधांची व्यापक तयारी : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

पुणे, दि. 12 : पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व संबंधित शासकीय विभागांनी सर्वसमावेशक नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संघटनांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटनांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे शहर पोलीस उपआयुक्त सोमय मुंढे, पुणे ग्रामीण पोलीस अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डुडी यांनी सांगितले की, अनुयायांसाठी पिण्याचे पाणी, वापराचे पाणी, शौचालये, वाहनतळ, दिशादर्शक फलके, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सेवा, औषधोपचार, ड्रोन व सीसीटीव्ही देखरेख, पुस्तकालय आदी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. अनुयायांना धुळीचा त्रास होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

PMPL ने बससेवेसंदर्भातील माहिती २५ डिसेंबरपर्यंत परिवहन विभागास सादर करावी, तसेच चालकांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय शिबीर आयोजित करणार आहे.
पोलीस विभागाने गरोदर महिला, वृद्ध आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र रांग व्यवस्थेचे नियोजन करावे, असा निर्देशही देण्यात आला.

कार्यक्रमस्थळी नियंत्रण कक्ष व तक्रार निवारण कक्ष उभारण्यात येणार असून, 2019-20 च्या आराखड्याशी तुलना करून यंदाच्या आराखड्यात सुधारणा करण्याचे आदेश दिले. तसेच खर्चाचा ताळमेळ आणि लेखापरीक्षणासाठी समिती नेमण्याचे निर्देश देण्यात आले.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले की, आषाढी वारीच्या धर्तीवर अनुयायांसाठी विस्तृत सुविधा दिल्या जाणार आहेत. शौचालयांची संख्या यंदा अधिक वाढविण्यात आली असून, पाणीपुरवठा, स्वच्छता, मनुष्यबळ व साधनसामुग्रीची उपलब्धता सुनिश्चित केली जात आहे.

संघटनांच्या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून कार्यक्रम अधिक सुरळीत व यशस्वी करण्यासाठी आवश्यक ती अंमलबजावणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button