मराठवाड्यात केवळ 98 जणांना ओबीसी प्रमाणपत्र; मनोज जरांगे पाटील यांची सरकारला दिरंगाई न करण्याची सूचना

पुणे दि. 12 :  मराठवाड्यात गेल्या तीन महिन्यांत ओबीसी प्रमाणपत्रासाठी आठही जिल्ह्यांमधून एकूण 594 अर्ज दाखल झाले असले तरी, त्यापैकी केवळ 98 अर्जदारांना प्रमाणपत्र मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे. या संथ गतीबद्दल मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारने ओबीसी (कुणबी) प्रमाणपत्र देण्यात दिरंगाई करू नये, अर्ज आल्यावर तातडीने प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजानेही मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

जरांगे पाटील पुढे म्हणाले,
“मराठा समाजाची लढाई आपण जिंकली आहे. गॅझेटिअरचा जीआर आमच्या हाती आला हे मोठे यश आहे. लेकराबाळांच्या भविष्यासाठी समाजाने अर्ज करायलाच हवेत. ग्रामीण भागातील अनेक गरीब लोकांना अर्ज प्रक्रिया समजत नाही. गाव पातळीवरील समित्यांचे गठन अद्याप झालेले नाही, त्यामुळे अर्ज कुठे करायचा हेच लोकांना कळत नाही.”

अनेक ठिकाणी अधिकारी आदेशच नसल्याचे सांगतात, असा आरोपही त्यांनी केला.
“फडणवीस साहेबांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश द्यावेत. ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button