बाणेरमध्ये तणाव : परवानगी मागितल्यावर चांदेरे गटाकडून धमकीचा आरोप; मुरकुटे यांची पोलिसात फिर्याद

पुणे दि. 12 : रस्ता आणि पाईपलाईनचे काम कायदेशीर परवानगी घेऊन करावे, असे सांगितल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे बाबुराव चांदेरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ, धक्काबुक्की करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष जयेश संजय मुरकुटे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाबुराव चांदरे, समीर चांदरे, सिद्ध कलशेट्टी आणि एका अनोळखी व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार ६ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता बाणेर येथील पॅन कार्ड क्लब रोडवर घडला होता. मुरकुटे यांनी आरोप केला की, त्यांच्या खाजगी मालमत्तेत घुसून धमकावण्यात आले, तसेच विकासकामांच्या संदर्भात दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुरकुटे म्हणाले की, प्रभाग क्रमांक ९ मधील कोणत्याही विकासकामात तडजोड केलेली नाही आणि भविष्यातही करणार नाही, असा शब्द त्यांनी नागरिकांना दिला. तसेच, पुणे महानगरपालिका प्रशासनाने एकाच वेळी आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची मागणीही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button