
नाशिकच्या तपोवन परिसरात आजपासून वृक्षतोडीस सुरुवात झाल्यानंतर स्थानिक पर्यावरणप्रेमींचा संताप उसळला आहे. 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारण्याची योजना असून, त्यासाठी जवळपास 1800 झाडं तोडावी लागणार असल्याने पर्यावरणप्रेमी अनेक दिवसांपासून विरोध करीत होते. त्याचदरम्यान, एसटीपी प्लांटसाठी अतिरिक्त झाडांची कत्तल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
नगरपालिकेच्या म्हणण्यानुसार, 447 झाडे तोडण्यास रीतसर परवानगी मिळालेली असून सर्व काम नियमानुसार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र पर्यावरण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की साधुग्राम संदर्भातील अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असताना, अतिरिक्त झाडे तोडून एसटीपीसाठी जागा मोकळी केली जात आहे.
तपोवन परिसरात उभारण्यात येणारा नवीन एसटीपी प्लांटही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याचबरोबर साधुग्रामसाठी प्रस्तावित भूसंपादनालाही स्थानिक शेतकऱ्यांचा ठाम विरोध आहे. टीडीआरद्वारे भूसंपादन करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला शेतकऱ्यांनी नकार देत बाजारभावानुसार फक्त रोखीने मोबदला देण्याची मागणी केली आहे.
महापालिकेचा 50% टीडीआर + 50% रोख मोबदल्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावला आहे. तसेच आरक्षण 377 एकरांवरून 1200 एकरांपर्यंत वाढवण्याच्या निर्णयालाही त्यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी शेतकऱ्यांशी चर्चेचे आश्वासन दिले आहे.तपोवनातील वृक्षतोड, साधुग्राम प्रकल्प आणि एसटीपी प्लांट यामुळे नाशिकमध्ये पर्यावरण, प्रशासन आणि स्थानिकांच्या हितसंबंधांवर मोठा वाद निर्माण झाला आहे.