
पुणे, दि. 10 : औंध रोड आंबेडकर चौक, बोपोडी ते जुन्या सांगवीला जोडणारा ३५ कोटींचा पूल मागील वर्षी लोकार्पण करण्यात आला होता. मात्र आता त्याच पुलावर तब्बल २० कोटी रुपयांचा सुशोभीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला असून हा खर्च “खाजगी बिल्डरच्या सोयीसाठी” होत असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०२१ मध्ये या पुलाचा प्रस्ताव तयार केला होता आणि पुणे महापालिकेने त्यातील निम्मा खर्च उचलला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या या पुलाच्या उपयोगितेविषयी सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित होत होते.
कमी वाहतूक, उलट दिशेची वाहने आणि गैरप्रकार
या पुलावरून होणारी वाहतूक अत्यल्प आहे. बोपोडी बाजूने पुलाला थेट जोड नसल्यामुळे अनेक वाहने उलट दिशेने येतात. वाहतूक कमी असल्याने येथे रात्री रेसिंग, दारूपान यांसारखे प्रकार होत असल्याच्या तक्रारीही स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. याच पुलावर आता तीन महिन्यांसाठी काम सुरू असून २० कोटींच्या सुशोभीकरणाचा खर्च केला जाणार आहे.
“सुशोभीकरणाचा उद्देश — बिल्डरपर्यंत पोहोचणारा रस्ता?”
जुन्या सांगवी बाजूला अत्यंत अरुंद गल्ल्या असूनही हा पूल १८ मीटर रुंदीचा बांधला गेला.
या भागात सुमारे ८ हेक्टरचा मोठा खाजगी प्रकल्प विकसित करण्याची बिल्डरची तयारी सुरू आहे. त्या प्रकल्पापर्यंत सोपा मार्ग तयार करण्यासाठीच हा पूल जास्त रुंद करण्यात आला आणि आता सुशोभीकरणाचे कामही त्याच कारणासाठी होत असल्याचा आरोप आप ने केला आहे.
मुकुंद किर्दत म्हणाले—
“हा पूल ब्ल्यू फ्लड लाईनमध्ये आहे. पूर आल्यास तो पाण्याखाली जाणार हे माहीत असूनही २० कोटींचे सुशोभीकरण करणे म्हणजे जनतेच्या पैशाचा अपव्यय आणि बिल्डरपूरक निर्णय.”
“जनतेच्या समस्या बाजूला, अनावश्यक खर्चाला प्राधान्य”
आप नेते पुढे म्हणाले की, या २० कोटी रुपयांचा वापर भाऊ पाटील रोड, खडकी रोड, जुन्या सांगवीतील वाहतूक कोंडी, रस्ते सुधारणा, सीसीटीव्ही, पावसाळी लाइन आणि पुररक्षक भिंत उभारण्यासाठी झाला असता तर तो अधिक योग्य ठरला असता