
पुणे, दि. 10 : राज्यातील मुलींच्या आरोग्याचे संरक्षण आणि त्यांच्या भविष्याची हमी बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्यातून ‘सर्व्हायकल कॅन्सर मुक्त महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेची सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून राबविण्यात आलेली ही मोहीम महिलांच्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेचे बळकटीकरण करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
भारतातील गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक सामान्य कर्करोग असून दर आठ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होतो. हा गंभीर आजार दररोज तब्बल २०० महिलांचे प्राण हिसकावतो. परंतु योग्य वेळी तपासणी, लसीकरण आणि उपचार झाल्यास हा कर्करोग पूर्णतः टाळता येऊ शकतो, असा आरोग्य विभागाचा भर आहे.
या मोहिमेअंतर्गत ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीकरण, जागृती मोहिमा आणि पालक संवादाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
राज्य शासनाने जीविका फाउंडेशनला अंमलबजावणी भागीदार म्हणून नेमले असून, जिल्हा परिषद पुणे व आरोग्य विभागाच्या समन्वयाने संस्था जागृती ते कार्यक्रम अंमलबजावणीपर्यंतची भूमिका पार पाडत आहे. तसेच कॉर्पोरेट CSR च्या माध्यमातूनही उपक्रमास गती मिळत आहे.
ZS – ग्लोबल मॅनेजमेंट अँड कन्सल्टिंग फर्म, आयसर्टिस, कॅरॅटलैन, ब्रिजनेक्स्ट इंडिया प्रा. लि. आणि जेबीएम ऑटो यांसारख्या संस्थांच्या सहाय्याने पुणे जिल्ह्यात ६००० हून अधिक मुलींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पुढील टप्प्यात बजाज फिनसर्व आणि ZS यांच्या मदतीने ५,००० अतिरिक्त मुलींना संरक्षण देण्याचे नियोजन आहे.
शाळांमध्ये शिक्षक आणि स्थानिक नेतृत्वाच्या सहभागातून जागृती व लसीकरण मोहिमा राबवल्या जाणार असून पालक व विद्यार्थिनींमध्ये लसीबद्दल विश्वास वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या उपक्रमाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
“सर्व्हायकल कॅन्सर मुक्त महाराष्ट्र मोहीम ही राज्यातील प्रत्येक मुलीपर्यंत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पोहोचविण्याची सामूहिक जबाबदारी आहे. राज्याच्या आरोग्यदायी भविष्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राने अधिक सक्रिय सहभाग नोंदवावा.”
मजबूत नेतृत्व, संस्थांची भागीदारी आणि समाजाचा सहभाग यांच्या बळावर पुणे जिल्हा ‘सर्व्हायकल कॅन्सर मुक्त’ महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीकडे वेगाने वाटचाल करीत आहे.