
पुणे : वाचनाची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी आणि पुण्याला पुस्तकांची राजधानी बनवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाला पुणेकरांनी अभूतपूर्व उत्साहाने साथ दिली. पुणे पुस्तक महोत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमात सायंकाळी पाचपर्यंत १ लाख ३५ हजार २३८ नागरिकांनी पुस्तक वाचन करून (फोटो अपलोडसह) सक्रिय सहभाग नोंदवला.
विशेष म्हणजे ७०,००० हून अधिक नागरिकांनी सकाळी ११ ते १२ या तासाभरात वाचन करून छायाचित्र अपलोड केले. त्यात महिला ५२% आणि पुरुष ४८% — महिलांनी पुस्तक वाचनात एक पाऊल पुढे टाकल्याचे या आकडेवारीतून दिसून आले.
१७ ते २२ वयोगट हा सर्वाधिक उत्साहाने वाचणारा गट ठरला. इतिहास, चरित्र, बालसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके ही सर्वात जास्त वाचली गेलेली पुस्तकं ठरली.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुणे पुस्तक महोत्सव १३ ते २१ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन कॉलेज मैदानावर होत आहे. त्या अनुषंगाने शाळा, महाविद्यालये, वाचनालये, रेल्वे, बसस्थानके, मेट्रो, कार्यालये अशा सर्वच ठिकाणी हा उपक्रम राबविला गेला. सोशल मीडियावर नागरिकांनी वाचन करतानाचे फोटो अपलोड केले.
या छायाचित्रांपासून ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हे वाक्य तयार करून गीनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यांनी या उपक्रमाला पाठबळ दिले आहे, असे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.

विधिमंडळातही वाचनाची मोहोर!
नागपूर विधानभवनातही या मोहिमेचा प्रभाव दिसला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, विरोधी पक्षनेते, मंत्री, आमदारांसह अनेक मान्यवरांनी पुस्तक वाचन करून उपक्रमाला साथ दिली
एकूण सहभाग : साडेसात लाखांपेक्षा अधिक!
शाळा, महाविद्यालये व सामाजिक संस्थांकडून सामूहिक वाचनाचे सुमारे १०,००० फोटो अपलोड झाले असून, प्रत्येक छायाचित्रात १०० पर्यंत वाचक समाविष्ट असल्याने, एकूण साडेसात लाखांहून अधिक नागरिक या वाचन चळवळीत सहभागी झाल्याचा अंदाज आयोजकांनी वर्तविला.
“वाचन ही समाजाला वैचारिक दिशा देणारी शक्ती आहे. आजच्या प्रतिसादाने वाचनसंस्कृतीचे सामर्थ्य अधोरेखित झाले.”
— राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव
उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
घटक माहिती
एकूण अपलोड फोटो १,३५,२३८
महिला सहभाग ५२% (७०,३२३)
पुरुष सहभाग ४८% (६४,९१५)
सर्वाधिक सक्रिय वयोगट १७–२२ वर्षे
लोकप्रिय साहित्यप्रकार इतिहास, चरित्र, बालसाहित्य, आत्मविकास
सर्वाधिक वाचली गेलेली पुस्तके छत्रपती शिवाजी महाराज (चरित्र), श्यामची आई, रिच डॅड पूअर डॅड, द अल्केमिस्ट, अॅटॉमिक हॅबिट्स, थिंक अँड ग्रो रिच, विंग्स ऑफ फायर, द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंड, स्टीव्ह जॉब्स