
नागपूर : राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून बिबट्या आणि वाघांच्या हालचालींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे समोर येत आहे. वन्य प्राण्यांच्या या वाढत्या वावरामुळे ग्रामीण भागासह शहरी परिसरातही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील पारडी शिवरामध्ये आज पहाटे बिबट्याने धुमाकूळ घातला. दोन दिवसांपूर्वी कापसी भागात हा बिबट्या दिसून आला होता. मात्र तेव्हा शोधमोहीम राबवूनही तो सापडला नव्हता. त्याच बिबट्याने आज पहाटे दोनपेक्षा अधिक नागरिकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हल्ल्यात जखमी झालेल्या दोन ते तीन नागरिकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेसंदर्भात संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती अपेक्षित आहे.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाची पथके देखील सज्ज झाली आहेत. दरम्यान, घटनास्थळावर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.