तुकाराम मुंडे नियुक्तीवर भाजप आमदारांचा आक्षेप; धमकी प्रकरणावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

नागपूर : नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NSSCDCL) या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून तुकाराम मुंडे यांची नुकतीच करण्यात आलेली कार्योत्तर नियुक्ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काही भाजप आमदारांनी या नियुक्तीवर गंभीर आक्षेप घेत नियुक्ती रद्द करण्यासह निलंबनाची मागणी सभागृहात जोरदारपणे मांडली.

भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, तुकाराम मुंडेंविरुद्ध आपण लक्षवेधी सूचना दिल्यानंतर आपल्याला धमकीचे फोन आले आहेत. “मुंडेंच्या समर्थकांकडून ‘बघून घेऊ’ अशी धमकी मिळाली”, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाचा अतिरिक्त पदभार चुकीच्या पद्धतीने ठेवून घेण्याचा मुद्दाही पुढे आणला.

दरम्यान, आमदार प्रवीण दटके यांनी देखील मुंडेंविषयी सभागृहात तक्रार नोंदवली. तर विरोधी पक्षाकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तुकाराम मुंडे यांच्या बाजूने भूमिका घेतली.

वडेट्टीवार म्हणाले, “तुकाराम मुंडे यांच्या प्रामाणिकतेबाबत अनेक वेळा चौकशी होऊन त्यांना क्लीन चीट मिळालेली आहे. नागपूर महापालिकेतील प्रकरण असो किंवा केंद्रीय महिला आयोगातील तक्रार — सर्व स्तरांवर ते निर्दोष ठरले आहेत. त्यामुळे केवळ दबावाखाली कोणतीही कारवाई होऊ नये.”

तथापि, त्यांनी धमकी प्रकरणालाही गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली. “जर लोकप्रतिनिधींना धमक्या मिळत असतील तर त्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची अपेक्षा आता राज्य सरकारकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button