
पुणे : “भारतात वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीत सनदी लेखापालांनी (CA) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी जीएसटी कौन्सिल सातत्याने कायद्यात आवश्यक बदल करीत आहे. ते बदल समजून घेण्यासाठी अशा राष्ट्रीय परिषदा अत्यंत उपयोगी ठरतात,” असे प्रतिपादन सेंट्रल जीएसटी अँड कस्टम्स पुणे विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त मयांक कुमार यांनी केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (ICAI) जीएसटी अँड इन्डायरेक्ट टॅक्स कमिटीच्या वतीने आणि आयसीएआय पुणे शाखेच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय जीएसटी परिषदेचे उद्घाटन मंगळवारी त्यांच्या हस्ते झाले. म्हात्रे पुलाजवळील सिद्धी बँक्वेट्स येथे हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी जीएसटी कमिटीचे व्हाईस चेअरमन सीए उमेश शर्मा, केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य सीए रेखा धामणकर, सीए अभिषेक धामणे, सीए राजेश अग्रवाल व पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मयांक कुमार म्हणाले, “अलीकडील काळात जीएसटी संकलन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. करदात्यांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी आणि लघु-मध्यम उद्योगांना दिलासा देण्यासाठी कर संरचनेत आवश्यक बदल करण्यात येत आहेत. इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये (ITC) काही गैरप्रकार दिसून येतात. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सनदी लेखापालांनी पुढाकार घ्यावा.”
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सीए हे देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारे आहेत. अर्थसंकल्पीय तरतुदींच्या शिफारशी, कर प्रणाली अधिक सोपी करण्याचे प्रयत्न हे सीए सतत करीत असतात.”
सीए उमेश शर्मा म्हणाले, “जीएसटीमध्ये सातत्याने बदल होत आहेत. त्या बदलांबद्दल अभ्यास करून तज्ज्ञ सेवा देण्यासाठी अशा परिषदा आवश्यक आहेत.”
सीए रेखा धामणकर, सीए राजेश अग्रवाल आणि सीए अभिषेक धामणे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सीए सचिन मिणियार यांनी स्वागत प्रास्ताविक केले; सीए सारिका दिंडोकर यांनी सूत्रसंचालन केले; तर सीए नेहा फडके यांनी आभार मानले.