
पुणे, दि. 9 : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) सन २०२५ अंतर्गत पिकांची उत्पादकता वाढविणे आणि सुधारित वाणांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने उन्हाळी हंगाम २०२५ मध्ये भुईमुग पिकासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरित केले जाणार आहे.
या अंतर्गत प्रति हेक्टर १५० किलो प्रमाणित भुईमुग शेंगांचे बियाणे (दर रु. ११४/- प्रति किलो) पुरविले जाणार असून प्रति लाभार्थी किमान ०.२० हेक्टर ते कमाल १ हेक्टर क्षेत्रासाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांकडे २० किलो आणि ३० किलो पॅकिंगमध्ये बियाणे उपलब्ध आहेत. आवश्यकता अधिक असल्यास अतिरिक्त रकमेचा भरणा शेतकऱ्यांनी स्वतः करावा लागणार आहे.
अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील प्रमाणित बियाणे वितरण, प्रात्यक्षिके, फ्लेक्झी घटक औषधे व खते या टाइलमधून अर्ज करावयाचा आहे. अर्जदार शेतकऱ्यांची Agristack वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी निवड ही लक्षांकाच्या अधीन राहून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्वावर केली जाणार आहे.
या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे यांनी केले आहे.