
नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना राजकीय वातावरण तापवणारी घटना समोर आली आहे. अधिवेशनाचा दुसरा दिवस असून विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये चुरशीचा सामना अपेक्षित असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका व्हिडिओद्वारे मोठा आरोप केला आहे.
दानवे यांनी ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी पैशांच्या बंडलांसह दिसत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. याच व्हिडिओवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे.
महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ सुनील तटकरे यांच्या माध्यमातून अंबादास दानवे यांच्याकडे पोहोचल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत कडक शब्दात प्रत्युत्तर दिले.
दानवे म्हणाले —
“तटकरेंचं आणि माझं गेल्या वर्षभरात बोलणंच झालेलं नाही. एखाद्या लग्न कार्यात भेट झाली असेल. माझ्या मोबाईलवर तटकरे यांचा या वर्षात एकही फोन आलेला नाही.”
तसेच,
“हा व्हिडिओ कुठून आला हे सांगण्याची गरज नाही. मुख्य प्रश्न एवढाच — व्हिडिओत दिसणारे तुम्हीच आहात का नाही? राजीनाम्याचा विषय करून मुद्दा भरकटवू नका,”
असा घणाघात करत दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट सवाल केला आहे. या घडामोडींमुळे हिवाळी अधिवेशनाच्या वातावरणात अचानक राजकीय वादळ उठले आहे.