व्ही. शांताराम चित्रपटात जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया; नवी झलक प्रदर्शित

भारतीय सिनेमातील दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित ‘व्ही. शांताराम’ या भव्य चित्रपटातील जयश्रीच्या व्यक्तिरेखेची पहिली झलक प्रदर्शित झाली आहे. अभिनेत्री तमन्ना भाटिया ही भूमिका साकारत असून व्ही. शांताराम यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी स्त्री – जयश्रीचा भावस्पर्शी प्रवास या चित्रपटात उलगडणार आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये तमन्ना गुलाबी साडीत सोज्वळ, नाजूक आणि आकर्षक अवतारात दिसत आहे. त्या काळातील वैभवशाली सिनेसृष्टी, कलात्मकता आणि भावनांचा संगम या पोस्टरमध्ये स्पष्टपणे जाणवत आहे.

चित्रपटात जयश्री ही केवळ शांतारामांची पत्नी नसून त्यांची पहिली प्रेरणा, कलात्मक सहप्रवासी आणि भावनिक आधारस्तंभ होती. सहकलाकार म्हणून सुरुवात होऊन विवाहापर्यंतचा प्रवास, प्रेमातील चढउतार, करिअर आणि त्यामागील संघर्ष यांचे प्रभावी दर्शन प्रेक्षकांना या चित्रपटातून घडणार आहे.

चित्रपट निर्मात्यांनी सांगितले की, “तमन्ना भाटिया ही व्यक्तिरेखा जबरदस्तपणे साकारत आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील शालीनता आणि भावनांची खोली जयश्रीला जिवंत करते.”

याआधी सिद्धांत चतुर्वेदीच्या शांताराम लुकला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. आता तमन्नाच्या पोस्टरनंतर चित्रपटातील भावनिक बाजू अधिक ठळक झाली आहे.

हा चित्रपट राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन यांच्या निर्मितीखाली तयार होत असून दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे. नवीन वर्षात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून भारतीय सिनेमाच्या सुवर्णकाळाला नव्या पिढीसमोर घेऊन येणारा एक भव्य सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button