
नागपूर – राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना राजकीय वादळ उठवणारी घटना समोर आली आहे. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये चुरशीचा सामना अपेक्षित असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका व्हिडिओद्वारे मोठा आरोप केला आहे.
दानवे यांनी ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी पैशांच्या बंडलांसह दिसत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. या व्हिडिओबरोबर दानवे यांनी सरकारवर कडाडून टीका केली.
दानवे म्हणाले,
“या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही… बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?”
या ट्वीटनंतर हिवाळी अधिवेशनातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे तर सत्ताधारी पक्षाकडून या प्रकरणाचे खंडन होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
अधिवेशनात कामकाज सुरू होण्याआधीच या ‘व्हिडिओ बॉम्ब’मुळे सत्ताधाऱ्यांची अडचण वाढणार असून या प्रकरणाचा राजकीय निकाल काय लागतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.