
पुणे दि. 7 : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल यांचे लग्न रद्द झाले आहे. याबाबत माहिती स्वतः स्मृती मानधनाने सोशल मीडियावरून दिली आहे. काही आठवड्यांपासून त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक अफवा पसरत असताना अखेर दोघांनीही स्वतःच सत्य स्पष्ट केलं आहे.
स्मृती म्हणाली, “गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप चर्चा सुरू आहे. मी खूप खाजगी स्वभावाची आहे, पण आता एक गोष्ट स्पष्ट सांगते की लग्न रद्द झालं आहे. हा विषय इथंच थांबवावा आणि आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा.” तसेच आम्हाला आमच्या वेगाने हे सगळं समजून घेऊन पुढे जाण्याची मोकळीक द्यावी, अशी विनंती तिने चाहत्यांना केली.
स्मृतीच्या पोस्टनंतर पलाश मुच्छलनेही इंस्टा स्टोरीद्वारे प्रतिक्रिया दिली. पलाश म्हणाला, “मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी कोणत्याही आधाराशिवाय पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवताना पाहणं माझ्यासाठी कठीण होतं. हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अवघड काळ आहे, पण मी माझ्या मूल्यांवर ठाम राहून शांतपणे याला सामोरे जाईन.”
दोघांनीही त्यांच्या कुटुंबाच्या खाजगी आयुष्याचा सन्मान राखण्याची विनंती केली असून, चाहत्यांनी या निर्णयाचा आदर करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.