
पुणे : भारतीय जनता पक्षाकडून आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी वचननामा तयार करण्याच्या प्रक्रिया वेगाने सुरू झाल्या आहेत. या वचननाम्याकरिता पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन पुणेकरांशी संवाद साधणार असून पुढील २५ ते ५० वर्षांतील पुण्याच्या विकासाचे नियोजन या संवादातून आकार घेणार आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी सांगितले.
महापालिका निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असल्याने पुणे शहर कोअर कमिटीची प्राथमिक बैठक रविवारी मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही भाजप ही निवडणूक मोहोळ यांच्या नेतृत्वातच लढणार असल्याचे जाहीर केले.
बैठकीस पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भिमराव तापकीर, सुनिल कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर तसेच वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, “पक्षाची यंत्रणा वर्षभर सक्रिय असते; परंतु निवडणुकीच्या दृष्टीने आणखी बळकटी करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांचे अर्ज दोन दिवस शहर कार्यालयात घेतले जातील आणि ते पुढील निर्णयासाठी प्रदेश कार्यालयाकडे पाठवले जातील.”
वचननाम्याबाबत मोहोळ यांनी स्पष्ट केले की, सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मते घेऊन सर्वसमावेशक वचननामा बनवला जाईल. “पुढील पाच वर्षांत वचननाम्यातील बाबींची १०० टक्के अंमलबजावणी करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युतीसंदर्भात मोहोळ म्हणाले, “आम्ही महायुतीचे घटक आहोत. जिथे सामंजस्य शक्य असेल तिथे महायुती म्हणून लढू, जिथे शक्य नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते.”
शहरात भाजपची संघटनात्मक ताकद मोठी असल्याने, अन्य पक्षांतून प्रवेश देताना कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
मतदारयादीतील त्रुटींवर गंभीरपणे लक्ष ठेवले असून त्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.