संकष्टी चतुर्थी निमित्त दगडूशेठ गणपतीसमोर पालेभाज्यांची आकर्षक आरास; ब्राह्ममुहूर्तात कृपा नाईक यांची गायन सेवा

पुणे :संकष्टी चतुर्थीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज विशेष सजावट आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बाप्पाच्या सभोवती विविध पालेभाज्यांची आकर्षक आरास करण्यात आली असून ही आरास पाहण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

आजच्या चतुर्थीपासून प्रत्येक चतुर्थीला ब्राह्ममुहूर्तात गायक कलाकाराला बाप्पा समोर आपली कला सादर करण्याची संधी ट्रस्टच्या वतीने देण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात आज कृपा किरण नाईक यांच्या मधुर भक्तिगायनाने झाली.

कृपा नाईक यांनी पहाटे ३ ते साडे ४ या वेळेत बाप्पा चरणी गायन सेवा सादर केली. त्यांच्या सुमधुर भक्तिगीतांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
“ब्राह्ममुहूर्तावर बाप्पा समोर गायन सेवा सादर करायला मिळणं म्हणजे मोठं भाग्य आहे,” अशा भावना कृपा नाईक यांनी व्यक्त केल्या.

या विशेष कार्यक्रमासाठी अध्यात्मिक गुरु डॉ. सुनील काळे आणि ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने उपस्थित होते.

भाविकांच्या सोयीसाठी दर्शन बारी व्यवस्था करण्यात आली होती.
धार्मिक कार्यक्रमांत –

पहाटे ३ वाजता ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक

पहाटे ५ ते दुपारी १ वाजेपर्यंत महाभिषेक

सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत गणेश अभिषेक

अशा धार्मिक विधींनी चतुर्थीचा उत्सव अधिक मंगलमय झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button