
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या फिट इंडिया – स्वस्थ भारत, सशक्त भारत या मंत्राला चळवळीचे रूप प्राप्त झाले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच सिद्ध करते, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
धानोरी परिसरात जिजाऊ प्रतिष्ठानचे माजी नगरसेवक अनिल उर्फ बाँबी टिंगरे यांच्या पुढाकाराने भव्य ट्री मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये परिसरातील तब्बल १२ हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला. पुरुष, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अशा तिन्ही गटांच्या शर्यतींना मोहोळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी समाजसेवक धनंजय जाधव, पूजा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. शर्यतीचा समारोप धानोरी डोंगरावरील वन विभाग परिसरात झाला. येथे अनिल टिंगरे आणि खासदार मोहोळ यांच्या पुढाकाराने वन उद्यान आकार घेत आहे. नागरिकांनी देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावला.
दरम्यान ट्री मॅरेथॉनमधील विजेत्यांना सायकल आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
“२०४७ मध्ये विकसित भारत उभारायचा असेल तर आरोग्याची काळजी आणि पर्यावरण संवर्धन या उपक्रमांची गरज आहे. नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याकडेही तितक्याच जबाबदारीने पाहिले पाहिजे,” असे प्रतिपादन मोहोळ यांनी केले.