हैदराबादमध्ये धडक ‘शंकर-जयकिशन’ची तालीम; महेश मांजरेकरांचा डबलशिफ्ट जल्लोष!

मराठी रंगभूमीवर लवकरच दाखल होणाऱ्या सुरज पारसनीस दिग्दर्शित ‘शंकर-जयकिशन’ या नाटकाच्या तालमीबद्दल एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. मराठी नाटकांच्या तालमी साधारणपणे मुंबई–पुण्यात होतात; मात्र या नाटकाच्या तालमी थेट हैदराबादमध्ये सुरू आहेत. त्यामुळे नाटकप्रेमींसह मराठी रंगभूमीला देखील हा लॉजिस्टिक निर्णय आश्चर्यचकित करणारा ठरला आहे.

या अनोख्या निर्णयामागील कारणही तितकेच मनोरंजक आहे. नाटकातील मुख्य भूमिका साकारत असलेले महेश मांजरेकर सध्या एक महत्त्वाचा दक्षिणात्य चित्रपट हैदराबादमध्ये शूट करत आहेत. शूटिंगसोबत नाटकाची तालीमही सुरळीत व्हावी, नाटकाच्या गुणवत्तेवर आणि प्रवासावर कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून तालीम हैदराबादमध्ये हलवण्यात आली आहे. महेश मांजरेकर आणि नाटकाचे अभिनेते-निर्माते भरत जाधव यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आणि संपूर्ण टीमला तातडीने हैदराबादमध्ये स्थलांतरित करण्यात आले.

सध्या भरगच्च शेड्यूलमध्ये दिवसा चित्रपटाचे चित्रीकरण आणि संध्याकाळी नाटकाची तालीम करत असल्यामुळे महेश मांजरेकर अक्षरशः ‘डबलशिफ्ट’ मोडमध्ये आहेत. नाटकावरील त्यांचे प्रेम आणि समर्पण पाहून संपूर्ण टीम अधिक प्रेरित झाल्याचे समजते. “नाटक हे माझं पहिलं प्रेम आहे” असे त्यांनी पूर्वी सांगितले होते, आणि आज त्यांच्या कृतीतून तो शब्द खऱ्या अर्थाने साकारतोय.

नाटकाच्या तालमी सेटवर आणि व्हॅनिटी व्हॅनमध्येही जोरात सुरू आहेत. विशेष म्हणजे मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता फहाद फासील यानेही टीमला भेटून नाटकाला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे या नाटकाभोवतीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

भरत जाधव एण्टरटेन्मेंट निर्मित या नाटकाचे दिग्दर्शन सुरज पारसनीस तर लेखन विराजस कुलकर्णी यांचे आहे. क्षितिज पटवर्धन यांच्या गीतांना अजित परब यांनी संगीत दिले आहे. नाटकात शिवानी रांगोळे, भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका असून, विनोद-भावना-नाती यांचे उत्कृष्ट मिश्रण यात पाहायला मिळणार आहे.

१९ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहातून ‘शंकर-जयकिशन’चा रंगतदार शुभारंभ होणार असून मराठी नाट्यप्रेक्षकांमध्ये या नाटकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button