
पुणे : शहरातील वाहतूककोंडी दिवसेंदिवस गंभीर होत असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाअभावी पुणेकर त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर लाइट रेल ट्रॅव्हल (एलआरटी ट्रॅम) हा मेट्रोला योग्य पर्याय ठरू शकतो, असे मत ग्रीन थंब संस्थेचे संस्थापक निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
त्यांनी सांगितले की, “एलआरटी ट्रॅमचे डबे मेट्रोप्रमाणे वातानुकूलित व आरामदायी असून एका डब्यात दोन पीएमपी बसेसएवढे प्रवासी प्रवास करू शकतात. बीआरटी मार्गाची दुरुस्ती करून त्यावर एलआरटी सुरू करता येईल. यामुळे वेळ आणि पैशांची मोठ्या प्रमाणात बचत होईल तसेच खासगी वाहनांचा वापर कमी होण्यास मदत होईल.”
दरम्यान, खडकवासला ते फुरसुंगी पाणी बोगदा प्रकल्पास ग्रीन थंब संस्थेने कडाडून विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पावर PMC हजारो कोटी रुपये खर्च करण्याच्या तयारीत आहे. कर्नल पाटील म्हणाले की, “या रकमेपैकी केवळ १% खर्च जरी गाळ काढण्यावर केला तरी मोठ्या प्रमाणात पाणी साठवण क्षमता वाढेल. गेल्या २० वर्षांपासून आम्ही कमी खर्चात गाळ काढण्याचे काम करत आहोत. या गाळामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते. तीन ते चार TMC ने पाणी साठा वाढण्यास मदत होते.”
कालवा बंद केल्यास पर्यावरणीय आणि भूजल पातळीवर मोठे परिणाम होतील, असा इशारा त्यांनी दिला. “कालव्याच्या काठावर असलेल्या विहिरींचे पाणी कमी होईल. पक्षी, प्राणी, कीटक यांच्या पाण्याच्या स्रोतावर परिणाम होईल. म्हणून कालवा बंद करण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा,” असे ते म्हणाले.
याशिवाय, कालव्याच्या काठावर दुचाकी व सायकलींना प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली. “ही परवानगी मिळाल्यास शहरातील ५०% वाहतूक कोंडी कमी होऊ शकते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.