पिंपरी-चिंचवडच्या दीपाली अमृतकर-तांदळे ठरल्या ‘मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’

पुणे : थायलंड येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘मिस अँड मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल-२०२५’ या प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहरातील दीपाली अमृतकर-तांदळे यांनी भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आपल्या कलात्मक सादरीकरणातून भारतीय संस्कृती आणि वारशाची छटा जागतिक व्यासपीठावर दाखवत ‘मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’ हा किताब त्यांनी पटकावला. त्यांच्या या मिळालेल्या मोठ्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हा किताब जिंकल्यानंतर पुण्यातील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दीपाली यांनी आपल्या ध्येयाच्या प्रवासाचा अनुभव मांडला. या वेळी त्यांच्या पती संतोष, मुलगा रेयांश तसेच आई-वडील सुनंदा आणि बाळकृष्ण अमृतकर उपस्थित होते.

पिंपळे गुरव येथे वास्तव्यास असलेल्या दीपाली आयटी क्षेत्रात नोकरी बजावत असून पत्नी आणि आई म्हणून जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी हे यश साध्य केले आहे.
स्पर्धेत २५ देशांमधील ४० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये सांस्कृतिक सादरीकरणात दीपाली यांनी बंगाली, राजस्थानी आणि मराठमोळ्या नववारी साडीसह गणेशस्तवन सादर केले. भारतीय संस्कृतीच्या बहुरंगी दर्शनाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ही स्पर्धा शांतता, पर्यटन, पर्यावरण, जागतिक संस्कृती आणि वारशाच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या ‘एप्लानेट प्रायव्हेट लिमिटेड’ मार्फत आयोजिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button