जामखेड  लॉजमधील नर्तिकेची आत्महत्या; माजी नगरसेवकाच्या नावावरून राजकीय खळबळ

जामखेड, दि. ६ : जामखेडच्या खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये दिपाली पाटील (वय ३५) या नर्तिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. दिपाली पाटील या जामखेडमधील कला केंद्रात नृत्य सादर करत होत्या.

दिपालीवर लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड यांच्यावर होत आहे. याच दबावामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. मात्र, पोलिस तपास सुरू असून अद्याप अधिकृत निष्कर्ष आलेला नाही.

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
“जामखेडमधील अवैध धंद्यांना कोणाचा आश्रय? दिपालीसोबत आत्महत्येपूर्वी कोण होते? त्याचे उच्चपदस्थांशी संबंध कोणते? तसेच या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊ नये,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपास गतीमान करण्याचे आवाहन केले.

दिपाली पाटील या मूळच्या कल्याण येथील. काही काळापासून त्या मैत्रिणीसोबत तपनेश्वर भागात राहत होत्या. ४ डिसेंबरच्या सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून त्या बाहेर पडल्या. परंतु परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. रिक्षा चालकाकडून माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी त्या साई लॉज येथे पोहोचल्या असता रूम आतून लॉक होती. डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता दिपालीने गळफास घेतल्याचे आढळून आले.

या प्रकरणाच्या तपासातून अनेकांचे ‘काळे चेहरे’ समोर येणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button