पुणे पुस्तक महोत्सव तयारी जोरात! फर्ग्युसन मैदानावर उभे राहत आहे भव्य वाचनोत्सव

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाच्या भल्या-मोठ्या दालनांच्या मांडव उभारणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. तब्बल ८०० हून अधिक नामांकित प्रकाशकांचे स्टॉल, बालवाचकांसाठी ‘चिल्ड्रेन कॉर्नर’, साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे अॅम्फी थिएटर, पुस्तक प्रकाशन मंच, भव्य प्रवेशद्वार आणि ‘फूड कोर्ट’ अशा आकर्षक सोयींसह या वर्षीचा वाचनोत्सव अधिक भव्य स्वरूपात रंगणार आहे.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने १३ ते २१ डिसेंबरदरम्यान तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून येणाऱ्या साहित्यप्रेमींना उत्कृष्ट वाचनानंद देण्यासाठी प्रकाशकांच्या स्टॉलसाठी ऐसपैस व्यवस्था करण्यात आली आहे. १२ डिसेंबर रोजी संगणकीकृत लॉटरी पद्धतीने स्टॉल वाटप होईल. कलर कोडिंग प्रणालीद्वारे वाचकांना स्टॉलपर्यंत सहज पोहोचता येणार आहे. तसेच वाय-फाय, आसनव्यवस्था, पिण्याचे पाणी, सुरक्षा यासाठी सीसीटीव्ही, लेखक-वाचक संवाद व पुस्तक प्रकाशनाचे स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध असणार आहे.

शनिवार वाड्याचे प्रवेशद्वार आणि पुस्तकरुपी बुरुज या बोधचिन्हावर आधारित प्रवेशद्वार महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. बालगोपाळांसाठी राखीव ‘चिल्ड्रेन कॉर्नर’मध्ये चित्रकला, शिल्पकला, लेखन-अभिनय आदी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. तर ‘पुणे लिट फेस्ट’ची पर्वणी सहा दिवस अॅम्फी थिएटरमध्ये रंगेल. रसिकांसाठी फूड कोर्टमध्ये २० हून अधिक खाद्य स्टॉल आणि ‘लाइव्ह म्युझिक’ची मजा देखील उपलब्ध असेल. मोठ्या प्रमाणावर पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

📚 महोत्सवात होणार पुस्तक प्रकाशने

संयोजन समितीने प्रकाशकांची बैठक घेऊन महोत्सवात केवळ व्यावसायिक नव्हे तर सामाजिक भान राखण्याचे आवाहन केले. प्रकाशनासाठी इच्छुकांनी ८ डिसेंबरपर्यंत पुस्तकांच्या दोन प्रती जमा कराव्यात. परीक्षणानंतर निवड झालेल्या पुस्तकांचे महोत्सवात प्रकाशन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button