कोरेगाव भिमा विजयस्तंभ अभिवादन दिनासाठी जलद तयारीस आदेश — जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. 4 डिसेंबर : कोरेगाव भिमा येथे दरवर्षीप्रमाणे विजयस्तंभ अभिवादन दिनाचे आयोजन सुरळीत पार पडावे यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. याबाबतचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला.

बैठकीस बार्टीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, पोलीस सह आयुक्त सोमय मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी यांनी विजयस्तंभ परिसरातील फुलांची सजावट, प्रकाशयोजना, स्वच्छता, स्मारकाची डागडुजी आणि दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. वाढत्या वाहन वर्दळीला नियंत्रणात ठेवण्यासाठी छोटे व मोठे वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग, प्रवेश-निर्गमन मार्गांची वेगळी आखणी, तसेच दिशादर्शक फलक लावण्याचे आदेश देण्यात आले.

अनुयायांच्या सोयीसाठी पायी मार्ग, सावली व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचे पॉईंट्स, मोबाइल टॉयलेट युनिट, महिला अनुयायांसाठी हिरकणी कक्षांची निर्मिती यावरही भर देण्यात आला. आरोग्य विभागाला आपत्कालीन सेवा, औषधे व रुग्णवाहिका सतत उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले.

सुरक्षेच्या दृष्टीने विस्तृत पोलीस बंदोबस्त, राज्य राखीव पोलीस दल, सीसीटीव्ही कॅमेरे, 24×7 नियंत्रण कक्ष, वायरलेस प्रणाली, ड्रोनद्वारे देखरेख आणि फायर ब्रिगेड सज्ज ठेवण्याची जबाबदारी संबंधित विभागांना सोपविण्यात आली.

जनसुविधा वाढविण्यासाठी बार्टीतर्फे बुक स्टॉल व माहिती केंद्र उभारण्यात येणार आहेत.

हा ऐतिहासिक आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचा कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी विभागांनी तयारीस गती द्यावी आणि अनुयायांना सुरक्षित व सन्मानपूर्वक वातावरण उपलब्ध करून द्यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button