शालेय बस नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४९ वाहनांवर कारवाई; २२ लाखांहून अधिक दंड वसुल

पुणे, दि. ५ : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची काटेकोर तपासणी करण्यात येत असून, १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत १ हजार ४६४ वाहनांची तपासणी करण्यात आली. यापैकी शालेय बस नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २४९ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून २२ लाख २२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक ही अत्यंत संवेदनशील बाब असल्याने शाळा व्यवस्थापन व बस चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीचे अध्यक्ष तथा पुणे पोलीस आयुक्त यांनी निर्देश दिले आहेत.

त्यानुसार, शालेय बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, ६ वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती, तसेच वाहनचालक व कर्मचाऱ्यांची पोलीस चारित्र्य पडताळणी अनिवार्य केली आहे. याशिवाय शाळेच्या शालेय परिवहन समिती व विद्यार्थी सुरक्षा समितीने या सर्व बाबींची नियमित तपासणी करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

१६ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार सर्व शाळांमध्ये शालेय परिवहन समिती व विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे. वाहनचालकांची दरवर्षी नेत्र तपासणी प्रमाणपत्र तपासणे आवश्यक असून, प्रमाणपत्र नसलेल्या चालकांना विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची परवानगी देऊ नये, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला आहे.

२३ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयान्वये विद्यार्थ्यांवरील अनुचित प्रकार रोखण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, तिच्या शिफारशींनुसार विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

परिवहन विभाग आणि पोलीस विभाग संयुक्त तपासणी मोहिम राबवणार असून, दोषी आढळणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शालेय सहलीदरम्यानही वाहतूक सुरक्षेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button