बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये!’ टॅगलाईनसह ‘आशा’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

पुणे दि. 5 :
महिलांच्या संघर्षमय प्रवासाला न्याय देणाऱ्या ‘आशा’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला असून, “बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये!” ही टॅगलाईन या चित्रपटाचा आत्मा असल्याचे ट्रेलर पाहताच जाणवते. रिंकू राजगुरू साकारत असलेली आशा सेविका सायकलवरून गावागावात आरोग्यसेवा पोहोचवताना दिसते आणि तिचा हा जिद्दीचा प्रवास प्रेक्षकांना भारावून टाकतो.

यापूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरने आणि ‘चालत रहा पुढे’ या प्रेरणादायी गाण्यानेच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली होती. आज झालेला ट्रेलर लाँच सोहळा आयुष्यमान भारत – मिशन महाराष्ट्र समिती अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, साहित्यिक विश्वास पाटील, लोढा फाउंडेशन अध्यक्षा मंजू मंगलप्रभात लोढा तसेच अनेक आशा सेविका यांच्या उपस्थितीत पार पडला.

रिंकू राजगुरू साकारत असलेल्या आशाच्या भूमिकेत गावोगाव लोकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणे, कुटुंबातील संघर्ष, सामाजिक दडपण आणि अन्यायाविरुद्धची ठाम लढाई यांचे हृदयस्पर्शी दर्शन घडते. तिच्या आयुष्यातील वेदना, तळमळ आणि न झुकणारी जिद्द ट्रेलरमध्ये ठळकपणे उमटते.

सायंकित कामत, उषा नाईक, सुहास शिरसाट, शुभांगी भुजबळ, दिशा दानडे, दिलीप घारे व हर्षा गुप्ते यांच्या भूमिका या कथेला अधिक बळ देतात. महिलांच्या जिवाभावाच्या संघर्षाचा वास्तववादी चित्रपट ‘आशा’ सर्व स्तरांवरील लाखो स्त्रियांचे प्रतिनिधित्व करतो.

दिग्दर्शक दीपक पाटील म्हणतात, “आशा ही एका सेविकेची नव्हे, तर आयुष्यभर इतरांसाठी झिजणाऱ्या सर्व अनामिक योद्ध्यांची कथा आहे.”

कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील निर्मित तर पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘आशा’ चित्रपट १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ट्रेलर, टीझर आणि गाण्यामुळे वाढलेली उत्सुकता पाहता हा चित्रपट भावस्पर्शी आणि प्रेरणादायी अनुभव ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button