
पुणे दि. 5 : तपोवनमधील वृक्षतोड प्रकरणावर भाजप नेते व मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर आता मोठा राजकीय वाद रंगला आहे. पर्यावरणवाद्यांवर निशाणा साधताना राणे यांनी ‘ईदच्या वेळी बकरी कापण्याला का विरोध करत नाहीत?’ असा सवाल उपस्थित केला होता.
या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत राणेंवर टीकास्त्र सोडले.
“वृक्षतोड हा पर्यावरणाचा विषय आहे, धर्माचा नाही. टिल्लू-स्तराची बुद्धी असलेल्याला असा गंभीर विषय काय समजणार? त्यांच्या सिस्टीममध्ये हिंदू-मुस्लीम, बकरा-कोंबडीच फिरतात. वृक्षतोडची फाईल तर ‘अनसपोर्टेड फॉर्मेट’ म्हणूनच उघडत नाही,” अशा शब्दांत त्यांनी राणेंवर हल्लाबोल केला.
तपोवनमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षतोड सुरू असल्याने पर्यावरणप्रेमी आणि कार्यकर्ते याचा विरोध करत आहेत. त्यातच नितेश राणे यांच्या वक्तव्याने हा वाद धार्मिक रंग घेत पुढे तापण्याची शक्यता आहे.