एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि फिलिप्स इंडियामध्ये सामंजस्य करार; प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिक्षणाला उद्योग-सहकार्याची जोड

पुणे : नावीन्य, संशोधन आणि भावी पिढीसाठी सक्षम मनुष्यबळ घडवण्याच्या उद्देशाने एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, पुणे आणि फिलिप्स इंडिया यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. उद्योग–विद्यापीठ सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा करार एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

या करारानुसार एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ हा विषय संरचित आणि कौशल्याधारित पद्धतीने समाविष्ट करण्यात येणार आहे. यासोबतच फिलिप्सच्या तज्ज्ञ मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना उद्योग-अनुभव, तज्ज्ञ व्याख्याने, उद्योगभेटी आणि प्रशिक्षण संधी मिळणार आहेत.

एमओयू स्वाक्षरी कार्यक्रमात फिलिप्स इंडियाकडून विस्पी काकारीयल, आशिष शाह आणि चेतन लोणकर उपस्थित होते. तर विद्यापीठाकडून कार्याध्यक्ष व प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर, प्र. कुलगुरु डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. स्वाती मोरे, डॉ. रेणू व्यास, डॉ. नचिकेत ठाकूर आणि डॉ. सुदर्शन सानप या मान्यवरांची उपस्थिती होती.

या प्रसंगी चेतन लोणकर यांनी विद्यापीठाच्या प्रगतिशील दृष्टीकोनाचे आणि प्रभावी समन्वयाचे कौतुक केले. उद्योग–विद्यापीठ सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एमआयटी एडीटी व्यवस्थापनाने दिलेल्या पाठबळाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या करारामुळे विद्यार्थ्यांसाठी परिवर्तनकारी शैक्षणिक संधी निर्माण होतील, संयुक्त संशोधनाला चालना मिळेल आणि आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रातील भावी विकासात मोलाचा वाटा उचलता येईल, असे प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button