
पुणे पुस्तक महोत्सव २०२५ निमित्त पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात पुस्तके वाचून सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठांचे कुलगुरू, संस्थाचालक आणि प्राचार्य यांच्या बैठकीत ते बोलत होते.
या वर्षीच्या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, चिल्ड्रन कॉर्नर, लिट फेस्टिव्हल, आणि विविध प्रकाशनांच्या पुस्तक स्टॉल्ससह फूड फेस्टिव्हलचादेखील समावेश आहे.
‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा विशेष वाचन उपक्रम ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या एका तासासाठी आयोजित करण्यात आला आहे. या वेळेत संपूर्ण पुणे शहर शांततेत वाचन करणार आहे. पुणेकरांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे पाटील यांनी आवाहन केले.
विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरणा देत पाटील म्हणाले की, ते स्वतः हजारो पुस्तक खरेदी व्हाउचर्सचे वाटप करणार आहेत. प्रत्येक महाविद्यालय आणि विद्यार्थ्याला हे व्हाउचर्स दिले जाणार असून त्यामुळे वाचनसंस्कृतीला चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महोत्सवाचे प्रमुख संयोजक राजेश पांडे यांनी कार्यक्रमातील विविध उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक यांनी पुणे हे ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ न म्हणता ‘पश्चिमेकडील नालंदा’ म्हणावे, असे गौरवोद्गार काढले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले. महाराष्ट्र राज्याचे संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी विद्यापीठे, महाविद्यालये, युवक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच उच्च शिक्षण विभागाचा स्टॉलही महोत्सवात असणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवी शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, देविदास वायदंडे, ज्योत्स्ना एकबोटे, प्राचार्या डॉ. संगीता जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केले तर रजिस्ट्रार डॉ. ज्योती भाकरे आणि प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर उपस्थित होते. सर्व स्वयंअर्थसाहाय्य विद्यापीठांचे कुलगुरू, प्राचार्यही यावेळी उपस्थित होते.