
अभिनेत्री-नृत्यांगना संस्कृती बालगुडे तिच्या पहिल्यावहिल्या डान्स ड्रामा “संभवामी युगे युगे”सह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कृष्णाच्या रूपात दिसणाऱ्या संस्कृतीचा अनोखा लूक सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असून तिच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
या शोचा पहिला प्रयोग साता समुद्रापार दुबईमध्ये 20 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. भारताबाहेर जाऊन पहिल्यांदाच असा महत्त्वाकांक्षी शो करीत असल्याने संस्कृतीची उत्सुकता आणि धाकधूक शिगेला पोहोचली आहे.
या प्रोजेक्टच्या मागील तिची मेहनत BTS व्हिडिओंमधून झळकत असून हा शो भारतात—विशेषतः महाराष्ट्रात—देखील लवकरच सादर केला जाणार असल्याची माहिती मिळते.
या विशेष उपक्रमाबद्दल संस्कृती म्हणाली,
“‘संभवामी युगे युगे’चा शुभारंभ दुबईत करण्याचं आधीपासून ठरलं होतं. कृष्णाला भाषा नसते असं म्हणतात, त्यामुळे परदेशातल्या प्रेक्षकांनाही अनोखा अनुभव द्यायचा आहे. पुढील शो भारतात करतानाही तेवढीच उत्सुकता आहे.”
या डान्स ड्रामामध्ये विविध कलांच्या समन्वयाचा मिलाफ पाहायला मिळणार असून दिग्गज अभिनेते सुमित राघवन यांनी कृष्णभूमिकेसाठी आवाज दिला आहे. त्यामुळे कृष्णरूपातील संस्कृतीची लीलया आणि किमया अनुभवण्याची संधी दुबईतील प्रेक्षकांना मिळणार आहे.