स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025 ची महाअंतिम फेरी पुण्यात; 36 तासांच्या अंतिम सत्रात २५ संघांची स्पर्धा

पुणे : केंद्रीय शिक्षण मंत्रालय, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) आणि इनोव्हेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025 (सॉफ्टवेअर एडिशन) ची महाअंतिम फेरी पुण्यात होणार आहे. होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर संचलित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (I2IT), हिंजेवाडी येथे येत्या सोमवारी (८ डिसेंबर) सकाळी ८ पासून मंगळवारी (९ डिसेंबर) रात्री ८ वाजेपर्यंत सलग 36 तास ही स्पर्धा रंगणार आहे.

अंतिम फेरीत देशभरातून निवडलेल्या २५ संघांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प सादरीकरण होणार असल्याची माहिती I2IT च्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेच्या विश्वस्त अमृता कटारा, उपप्राचार्या प्रा. माधुरी रेड्डी, प्रा. रवींद्र जोशी, प्रा. प्रकाश क्षीरसागर व प्रा. मंदार दातार आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. वैशाली पाटील म्हणाल्या, “स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही २०१७ पासून सुरू झालेली जगातील सर्वात मोठ्या ओपन इनोव्हेशन स्पर्धांपैकी एक आहे. विविध मंत्रालये, उद्योग, सामाजिक क्षेत्रातील प्रत्यक्ष समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश या स्पर्धेमागे आहे.”

या स्पर्धेस पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांता मुजुमदार व जयंत चौधरी यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.


स्मार्ट ऑटोमेशन, फिनटेक, फिटनेस अँड स्पोर्ट्स, स्पेस टेक्नॉलॉजी, हेरिटेज अँड कल्चर, मेडिटेक, हेल्थकेअर, कृषी-ग्रामीण विकास, स्मार्ट व्हेईकल्स, वाहतूक-लॉजिस्टिक्स, रोबोटिक्स-ड्रोन, स्वच्छ-हरित तंत्रज्ञान, शाश्वत ऊर्जा, सायबर सुरक्षा, स्मार्ट एज्युकेशन आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील प्रकल्पांचे प्रदर्शन होणार आहे.

मंगळवारी रात्री ८ वाजता पारितोषिक वितरण सोहळ्यानंतर विजयी संघांची घोषणा करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button