तपोवनातील वृक्षतोड वादावर नितेश राणेंचा सवाल – “झाडांना मिठी मारता, बकरी ईदला गप्प का?”

पुणे दि. 4 : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील तब्बल 1800 झाडांची तोड होणार असल्याने पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध सुरू केला आहे. राजकीय पक्षांकडूनही या निर्णयावर विरोधाची भूमिका घेण्यात येत असताना, भाजप आमदार नितेश राणे यांच्या एका विधानाने नवा वाद पेटला आहे.

“तपोवन वृक्षतोडीवर चिंता करणारे पर्यावरणवादी बकरी ईदला गप्प का?” असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला असून त्यांच्या या वक्तव्यावरून प्रतिक्रिया-प्रतिक्रियांची मालिका सुरू झाली आहे. या वक्तव्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अधिक स्पष्टीकरण देत, “झाडाला मिठी मारतात, तर बकरीला का मिठी मारत नाहीत?” असा अप्रत्यक्ष टोला लगावला.

“ईदमध्ये मोठ्या प्रमाणात बकरींची हत्या होते. तेव्हा हे पर्यावरणवादी कुठे असतात? रक्ताचे पाट वाहिले तरी गप्प राहतात. ‘व्हर्च्युअल बकरी ईद’ का म्हणत नाहीत? मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले, “कुंभमेळ्याच्या सोयीसाठी साधुग्राम तयार केला जात आहे. हा हिंदूंचा महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. मात्र त्याची बदनामी करणे हा काहींच्या अजेंड्याचा भाग झाला आहे. झाडं जगली पाहिजेत यात वाद नाही. पण विरोध फक्त हिंदू सणांवरच का?”

“कुंभमेळा हा कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नाही. मग हिंदूंच्या सणावरच प्रेम उमटते आणि इतर धर्मांच्या वेळी विरोध का दिसत नाही? रक्त वाहतं तेव्हा पर्यावरणाची हानी होत नाही का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

तपोवन वृक्षतोडीच्या वादाला आता धार्मिक आणि राजकीय वळण लागल्याचे चित्र राजकीय वर्तुळात दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button