
पुणे : शेतकऱ्यांना अपघातग्रस्त अवस्थेत तात्काळ मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना पूर्णपणे डिजिटल केली आहे. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या किंवा वारसदारांच्या बँक खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
पूर्वी ऑफलाइन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता संपूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात ४ हजार ३५९ लाभार्थ्यांना ८८ कोटी १९ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
शेतीत काम करताना झालेल्या अपघातांमुळे मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून अर्थसहाय्य दिले जाते. अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, तर एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्याची स्थिती महाडीबीटी पोर्टलवर पाहता येईल. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास एसएमएसद्वारे तात्काळ सूचना पाठवली जाणार आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय तपासणी करणार असून तहसीलदार अध्यक्ष असलेल्या समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट डीबीटीद्वारे खात्यात जमा करण्यात येणार आहे.