
पुणे दि. 3 : डोळे दिपवणारी सजावट, मानपान, भपकेबाज कार्यक्रम आणि जेवणावळी अशा कारणांनी लग्नसोहळे गाजतात. मात्र कसबा पेठचे आमदार हेमंत रासने यांच्या कन्येच्या विवाहसोहळ्यात माणुसकी आणि प्रामाणिकपणाचा अनोखा गौरव घडला.
कचऱ्यात सापडलेली तब्बल दहा लाख रुपयांची रोकड मूळ मालकाला प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कचरावेचक अंजूताई माने यांचा सन्मान चक्क राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या हृदयस्पर्शी प्रसंगाला दाद दिली.
‘स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा’ या ध्येयाने कार्यरत असलेल्या आमदार हेमंत रासने यांच्या कन्या तेजस्विनी रासने हिचा विवाह बुधवारी विनीत अगरडे यांच्याशी झाला. ऑक्सफर्ड रिसॉर्ट येथे आयोजित स्वागत सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.
‘स्वच्छ’ संस्थेमार्फत कचरा वेचक म्हणून कार्यरत असलेल्या अंजूताई माने यांना काही दिवसांपूर्वी काम करताना दहा लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी आढळली. कोणतीही मोहाची नजर न ठेवता मूळ मालकाचा शोध घेऊन त्यांनी ती त्याच्याकडे सुपूर्द केली. या प्रामाणिकतेच्या कृतीचा सन्मान करण्यासाठी रासने कुटुंबियांतर्फे अंजूताई यांना ५१ हजार रुपये रोख आणि साडी देऊन गौरविण्यात आले.
“प्रामाणिकपणा हा गुण दुर्मीळ होत चालला आहे. अशा काळात दहा लाखांची पिशवी परत करणारा हा मोठा आदर्श आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अंजूताईंचे कौतुक केले.
नवविवाहित दांपत्य आणि रासने-अरगडे कुटुंबाने या सन्मानातून सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.