वारली संस्कृतीवर आधारित ‘असुरवन’ ५ डिसेंबरला प्रदर्शित; सचिन आंबात आणणार आदिवासी परंपरेचं थरारक दर्शन

पुणे दि. 3 : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील हमरापूर (आंबातपाडा) येथून आलेले मराठमोळे दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात आपली प्राचीन वारली आदिवासी संस्कृती रुपेरी पडद्यावर मोठ्या दिमाखात घेऊन येत आहेत. त्यांचा आगामी मराठी चित्रपट ‘असुरवन’ येत्या ५ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

स्वप्नस्वरूप प्रस्तुत बहुप्रतिक्षित असुरवनचे मोशन पोस्टर, टीझर आणि ट्रेलर सोशल मीडियावर झळकताच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वाघाच्या चित्राने सजवलेला अॅडवेंचरिस्टिक मुखवटा, रहस्यमय जंगल आणि वारली संस्कृतीची सांगड यामुळे कथेबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

वारली संस्कृतीविषयी दिग्दर्शक सचिन आंबात सांगतात, “असुरवन म्हणजे माझ्या बाबांचं स्वप्न. वारली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणूनच मी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांनी टीझर आणि ट्रेलरला अप्रतिम प्रतिसाद दिला.”

चित्रपटाचे चित्रीकरण वाडा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये, बदलापूरच्या बोहोनोली गावात तसेच अंबरनाथमधील गोरपे गावाच्या घनदाट जंगलात झाले आहे. यामध्ये प्राचीन वारली संस्कृतीचं मंदिरही दाखवण्यात आलं आहे.

कथानकामध्ये निसर्गपूजक वारली संस्कृतीची अनोखी ओळख उलगडत जाते. येथे देव मूर्तीत नसून निसर्गात वास करतो. वाघोबा देव जंगलाचा राजा मानला जातो. ‘रवाळ’ या त्यांच्यातील दैवी रीतिरिवाजातून मुखवटाधारी नृत्य, दैवी शक्तीचा संचार आणि जंगलसंरक्षणाची शिकवण दाखवण्यात आली आहे.

“मराठीत सस्पेन्स-थ्रिलर शापित जंगलाची कथा पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर येत आहे. प्रेक्षकांनी नक्की थिएटरमध्ये येऊन आदिवासी संस्कृतीचा हा अनुभव घ्यावा,” असे सचिन आंबात शेवटी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button