
पुणे, दि. 3 : नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी सुरू असताना तपोवनातील साधुग्राम विकसित करण्यासाठी तब्बल 1825 झाडांच्या तोडीचा प्रस्ताव समोर आला असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना, कुंभमेळा ही आपली प्राचीन आणि सनातन परंपरा असून या विषयावर राजकारण करणे योग्य नसल्याचे सांगितले.
तपोवनातील झाडतोडीच्या प्रस्तावाबाबत फडणवीस म्हणाले की, “आमचं मत झाडं कापणं योग्य नाही. कमीतकमी झाडं कापायला हवीत. पण वास्तवही लक्षात घ्यावं लागेल. महानगरपालिकेने हा निर्णय का घेतला याचा विचार करायला हवा.”
प्रयागराजमध्ये झालेला कुंभमेळा 15 हजार हेक्टर जागेत झाला होता, तर नाशिकमध्ये साधुग्रामसाठी केवळ 350 एकर जागा उपलब्ध आहे. झाडांची दाटी वाढल्यामुळे सध्याच्या ठिकाणी साधुग्राम उभारणे अशक्य झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
फडणवीस म्हणाले, “2015-16 च्या गुगल इमेजमध्ये येथे एकही झाड दिसत नाही. राज्य सरकारच्या 50 कोटी वृक्षरोपण मोहिमेअंतर्गत येथे झाडे लावण्यात आली. तरीही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करणे योग्य नाही. काही मोठी झाडे काढून आम्ही त्यांचे पुनर्लावण (रिलोकेशन) करू.”
कुंभमेळा हा पर्यावरणाशी असलेला संबंध दृढ करणारा उत्सव असल्याचे सांगत त्यांनी ‘क्लीन गोदावरी’ मोहीम राबविण्याची घोषणाही केली. “तपोवनात विनाकारण वृक्षतोड होणार नाही. केवळ आवश्यक तीच झाडे कापली जातील,” असे आश्वासन त्यांनी दिले.