‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ : ९ डिसेंबरला पुणेकर एकत्र वाचून विश्वविक्रम स्थापणार

पुणे दि. 3 : पुणे पुस्तक महोत्सव हा आता पुणेकरांच्या अभिमानाचा आणि संस्कृतीचा उत्सव ठरला आहे. वाचन संस्कृतीचा जागर देशभरात पोहोचविण्याचे कार्य नागरिकांकडून होत असून, आता पुढील ध्येय म्हणून पुणे शहराला ‘पुस्तकांची राजधानी’ बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा अनोखा उपक्रम ९ डिसेंबरला सकाळी ११ ते १२ या वेळेत संपूर्ण पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात ५ लाखांहून अधिक पुणेकर एकत्र पुस्तक वाचून विश्वविक्रमाचा मान पटकावणार आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, सरकारी व खासगी क्षेत्रातील कर्मचारी, सामाजिक संघटना, व्यावसायिक, साहित्यिक, पत्रकार अशा सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन पुणे पुस्तक महोत्सव आणि नॅशनल बुक ट्रस्ट यांनी केले आहे.

शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालये, धार्मिक स्थळे, बस-रेल्वे स्थानके, विद्यापीठे, कार्यालये अशा सर्वच ठिकाणी वाचनाचा उत्सव रंगणार असून, प्रत्येकाने आपल्या आवडीचे कोणतेही पुस्तक वाचायचे आहे.

फोटो अपलोड करून विश्वविक्रमात नोंद
वाचन करतानाचा फोटो photoupload.pbf25.in या वेबसाइटवर किंवा उपलब्ध QR कोडद्वारे अपलोड करायचा असून, या उपक्रमाची सर्व माहिती पुणे पुस्तक महोत्सवाच्या सोशल मीडिया हँडलवर उपलब्ध आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी दिली.

या उपक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाऊंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

“पुणे पुस्तक महोत्सवाचा व्याप वाढत आठशे दालनांपर्यंत पोहोचला आहे. आता जगाच्या नकाशावर पुण्याचे नाव ‘पुस्तकांची राजधानी’ म्हणून कोरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी ९ डिसेंबरला आपल्या आवडीचे पुस्तक वाचत विश्वविक्रमाचा भाग व्हावे.”
— राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button