
पुणे दि. 3 : जागतिक एड्स दिनानिमित्त मंथन फाउंडेशनतर्फे बुधवार पेठ परिसरात विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी HIV संदर्भातील संस्थेचे उपक्रम आणि जागतिक स्तरावरही संस्थेच्या कामाची घेतलेली दखल याबद्दल माहिती दिली. जागतिक एड्स सप्ताहानिमित्त रॅली, जनजागृती कार्यक्रम, विशेष महिला उपक्रम, राशन वितरण, महाविद्यालयीन स्तरावरील उपक्रम, पथनाट्य, आरोग्य तपासणी शिबिरे अशा विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, पुणे यांच्या क्लस्टर प्रोग्राम मॅनेजर डॉ. प्रियांशा यादव यांनी जागतिक एड्स दिन २०२५ ची थीम —
“अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एचआयव्ही/एड्सला लढा देऊ, नवं परिवर्तन घडवू!”
— याबद्दल माहिती देत उपस्थितांशी संवाद साधला.
यानंतर डॉ. यादव यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली तसेच जनजागृतीपर मार्गदर्शनही केले. या कार्यक्रमांतर्गत ७५ महिलांना राशनचे वाटप करण्यात आले.
जिल्हा पर्यवेक्षक सुधीर सरवदे यांनी जिल्हा स्तरावर चालू असलेल्या विविध सेवा व उपक्रमांची माहिती दिली. तर दीपक निकम यांनी HIV पॉझिटिव्ह महिलांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंथन फाउंडेशनच्या पौर्णिमा चौधरी, कविता मगर, सुवर्णा पवार, बाबू शिंदे, शुभांगी बाविस्कर, हर्षा, कल्पना, अर्चना आणि मीनाक्षी यांनी विशेष योगदान दिले.