
पुणे दि. 3 : पुण्याच्या जागतिक संपर्क क्षमतेत मोठी भर घालत एअर इंडिया एक्सप्रेसने आजपासून पुणे–अबू धाबी थेट विमानसेवेला प्रारंभ केला आहे. दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री २१:१० वाजता पुण्याहून विमान अबू धाबीकडे रवाना होणार आहे.
मध्यपूर्वेत कार्यरत असलेले हजारो कामगार, व्यावसायिक, स्टार्टअप आणि आयटी क्षेत्रातील उद्योजक, तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सेवा मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.
पुणे हे शिक्षण, आयटी, संरक्षण, उत्पादन, संशोधन आणि सांस्कृतिक वारसा या क्षेत्रांत देश-विदेशात ठसा उमटवत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांच्या विस्तारामुळे परदेशी गुंतवणूक, व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांना मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या नव्या मार्गामुळे पुणे विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जा अधिक बळकट होणार असून शहराच्या प्रगतीचा मार्ग आणखी व्यापक प्रमाणात खुला होणार आहे.
💬 केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया
“पुणे–अबू धाबी थेट उड्डाणाची सुरूवात ही शहराच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाची साक्ष आहे. व्यापार, उद्योग, रोजगार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी या सेवेच्या माध्यमातून निर्माण होतील. पुण्याच्या सर्वांगीण विमानतळ विस्तारासाठी आपण एकनिष्ठपणे काम करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे विमानवाहतुकीत अभूतपूर्व प्रगती होत आहे,” असे मोहोळ यांनी सांगितले.