
पुणे दि. 3 : सूत्रांच्या माहितीनुसार राज्य निवडणूक आयोग आचारसंहिता शिथील करण्यासाठी कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर करावेत तसेच निकाल लागू होईपर्यंत आचारसंहिता कायम ठेवावी, असा आदेश कोर्टाने दिला आहे.
दरम्यान, ज्या भागात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या भागातील आचारसंहिता शिथील करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग न्यायालयाची परवानगी मागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयोगाच्या या मागणीवर कोर्ट काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आज मतदान पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर रोजी 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र काही ठिकाणची मतदान प्रक्रिया न्यायालयीन कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 24 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी 20 डिसेंबरला मतदान, तर 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी आता एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला होणार आहे.